ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे 18 नोव्हेंबर रोजी भिक मांगो आंदोलन.
……………………………
बारामती पंचायत समितीला घेराव घालून करणार प्रशासनाचा तीव्र निषेध.
स्टारयुग लाईव्ह : बारामती
बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघ संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मंगळवार दि 18 नोव्हेंबर 2025 रोजी पंचायत समितीला घेराव घालण्यास भिक मांगो आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक सरचिटणीस कॉम्रेड ज्ञानोबा घोणे यांनी दिली.
गेल्या अनेक दिवसापासून बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे असंख्य प्रश्न प्रलंबित असल्याने कर्मचाऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यात पुणे जिल्ह्यातील 12 तालुक्यात फरकाचे वाटप करण्यात आले असून, बारामती तालुक्यात मात्र प्रामुख्याने 19 महिन्याच्या फरकाचा प्रश्न गेल्या एक वर्षापासून धुळखात पडून आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे अनेक प्रलंबित प्रश्न अरगळीत पडून असून यामध्ये राहणीमान भत्ता भविषय निर्वाह निधी सेवा पुस्तक अद्यावत विमा प्रश्न ग्रामपंचायत हिश्याचा पगार अनेक ग्रामपंचायतींना मिळत नसल्याच्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहेत. या सर्व प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तालुक्यातील कर्मचारी प्रशासनाच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत परंतु या सर्व अडचणीवर मार्ग कधी निघणार हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरीच आहे.
गेल्या अनेक वर्षापासून बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची प्रशासनाच्या अडवणूक भूमिकेमुळे पूर्णपणे वातहात झाली आहे. कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटत नसल्याने ग्रामपंचायत कर्मचारी संघटना आक्रमक झाले असून संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. संघटनेच्या वतीने सर्व प्रशासनाला पत्र व्यवहार करून आंदोलनाचा लेखी इशारा देण्यात आलेला आहे.
यामध्ये 1) 19 महिन्याचा पगार फरक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पारदर्शकपणे वितरित करण्यात यावा.2) कोरोना प्रोत्साहन भत्ता तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना 25 नोव्हेंबर 2025 पूर्वी अदा करण्यात यावा. 3) तालुक्यातील ज्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना बोनस मिळालेला नाही त्यांना त्वरित बोनस अदा करण्यात यावा. 4) गेल्या काही वर्षापासून कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत हिश्याची रक्कम मिळत नाही ती तातडीने मिळावी. या प्रमुख मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने आंदोलनाच्या हत्यार उपसले आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची सोडवणूक करण्यासाठी बारामती तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने मंगळवार दि 18 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता बारामती पंचायत समितीला घेराव घालून भिक मांगो आंदोलन करणार असल्याचा लेखी पत्रवार संघटनेच्या वतीने तालुक्यातील सर्व प्रशासनाला करण्यात आलेला आहे.
























