स्टारयुग लाईव्ह : मोरगाव
मोरगाव ता बारामतीतील रयत शिक्षण संस्थेच्या श्री मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नुकताच दोन दिवसीय क्रीडा महोत्सव संपन्न झाला. या महोत्सवानिमित्त विद्यालयाच्या वतीने विविध खेळांचे करत विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग नोंदवला होता.
मयुरेश्वर विद्यालयात नुकतेच 17 व 18 डिसेंबर रोजी शालेय जीवनात विद्यार्थ्यांसाठी असलेले खेळाचे महत्व ओळखून हा दोन दिवसीय क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यामध्ये वैयक्तिक व सांघिक खेळांचा समावेश करून विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना चोख मार्गदर्शन करण्यात आले होते.
सांघिक खेळामध्ये कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल तर वैयक्तिक खेळामध्ये गोळा फेक खेळाचे आयोजन करण्यात आले होते. या दोन दिवसीय क्रीडा महोत्सवात शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला होता. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक पोपटराव तावरे, प्राचार्य अर्जुन कोकरे व इतर शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या क्रीडा महोत्सवात विद्यार्थी सर्व शिक्षक व शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता. विद्यार्थ्यांमधील चिकाटी व विविध गुणांचा विकास व्हावा तसेच शारीरिक क्षमता विकसित व्हावी या प्रमुख उद्देशाने या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विद्यालयाचे क्रीडा शिक्षक रमेश शेवते यांनी दिली. प्राचार्य शिक्षक व विद्यार्थ्यांच्या एकत्रित सहभागाने हा दोन दिवसीय कार्यक्रम उत्स्फूर्तपणे आनंदरीत्या पार पडला.

























