“कांदा सडतोय अन् शेतकरी रडतोय.
……………………………..
हमीभाव आणि निर्यात धोरणाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका..
स्टारयुग लाईव : मोरगाव ( राहुल तावरे )
ऐन दिवाळीत कांद्याला योग्य दर न मिळाल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. बाहेरील राज्यात कांद्याची मागणी घटल्याने व निर्यातीबाबत केंद्र सरकारकडून ठोस धोरण नसल्याने बाजारातील कांद्याचे भाव प्रचंड कोसळले आहेत.
पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन झाले आहे परंतु कांद्याला बाजारात मागणीच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या नवीन कांदा बाजारात आल्याने जुन्या कांद्याचा भावही धुळीस मिळाला आहे. योग्य बाजार भाव अभावी कांदा शेतातच सडत असून शेतकरी मात्र डोळ्यात पाणी आणून रडत आहे अशी वास्तववादी परिस्थिती आहे.
शेतकऱ्यांचा जीव वाचवून आत्महत्या थांबवायचे असतील तर शासनाने कांदा बाजारात हस्तक्षेप करून ठोक बाजारभावासाठी पावले उचलणे काळाची गरज असल्याचे मत शेतकऱ्यांमधून व्यक्त होऊ लागले आहे. सध्या किमान दहा किलोला दोनशे रुपये दराने कांदा खरेदी करून कांद्यासाठी अनुदान योजना सुरू करावी अशी शेतकऱ्यांची माफक अपेक्षा आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा साठविकेसाठी लाखो रुपये खर्च करून वेळप्रसंगी कर्ज काढून कांदा साठवणीसाठी वखारी उभारल्या परंतु कांद्याचाच खर्च निघत नसल्याने वखारी मोकळ्या पडून आहेत. यापूर्वी मे व जून महिन्यात कांद्याला 180 ते 200 रुपये बाजार भाव मिळत होता त्यामुळे शेतकरी प्रचंड आशावादी होता. परंतु ऑगस्ट महिन्यानंतर 100 रुपयांपेक्षाही खाली आला. सध्या बाजारात कांदा दोन ते तीन रुपये किलोने विकला जात असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.
एकरी लाखो रुपयांचा खर्च करून मोठ्या जोमाने आणलेल्या कांदा पिकाला बाजार भाव उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी अँड दिवाळीत हवालदिल झाला आहे. सततचा पाऊस व वातावरणातील बदलामुळे साठवलेला कांद्याला वास येत असून “कांदा सोडतोय अन शेतकरी रडतोय” अशी वास्तववादी परिस्थिती निर्माण झाली आहे. कांदा सडल्यामुळे त्याचा दर्जा ढासळत चालला असून उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. शासनाच्या निर्यात धोरणातील अनिश्चिततेमुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून, ठोस बाजार भाव अभावी प्रचंड नाराजी वाढली आहे.
चौकट:- कांद्याला बाजार भाव मिळेल या आशेने कांद्याचे भरपूर उत्पादन घेतले परंतु हमीभाव न मिळाल्याने कांदा शेतातच पडून आहे. शासनाने कांदा पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.
शेतकरी :- केतन बाळासो तावरे

























