स्टारयुग लाईव्ह : मोरगाव ( 
(राहुल तावरे )
अवघ्या काही तासावर येऊन ठेपलेल्या मोरगाव ता बारामती येथील मयुरेश्वराच्या राजेशाही दसऱ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, मोरगावकरांनी या ऐतिहासिक दसऱ्याची लगबग जोमात सुरू केली आहे. यामुळे संपूर्ण मोरगावात दसऱ्याचा अनोखा जलवा पाहायला मिळत आहे.
अष्टविनायकातील प्रथम मानाचे स्थान असलेल्या मोरगाव ता. बारामती येथील मयुरेश्वर मंदिरात श्रींचा दसरा महोत्सव दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दसरा उत्सवाचे मंदिरातून निघणारी श्रींची पालखी हे मुख्य आकर्षण असते. या पालखी उत्सवा दरम्यान गावात होणारे भुईमुळे व रंगबेरंगी फटाक्यांची आतिषबाजी पाहण्यासाठी राज्यासह पर राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.
दसऱ्या दिवशी पहाटे पाच तोफांच्या सलामीने खऱ्या अर्थाने या उत्सवाला सुरुवात होते. त्यानंतर सकाळी नऊ वाजता मयुरेश्वर मंदिरासमोरील फरसावर ग्रामस्थांची नियोजन बैठक पार पडून रात्रीच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवली जाते. दसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता श्रींना राजे शाही काळातील हिरे जडित पोशाख चढवला जातो.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेला मोरगावचा शाही दसरा उत्सवाची गेल्या महिनाभरापासून मयुरेश्वर नगरीत जोरदार सारी सुरू असून ही तयारी सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. गावात ठिकठिकाणी आकर्षक कमानी सूचनाफलक स्वच्छता दिवाबत्ती आदी कामकाज पूर्ण करण्यात आले आहे. तसेच मोरगावतील घराघरात दसरा उत्सवासाठी शोभेच्या दारूचे भुईनळे बनवण्याचे काम सुरू असून मोरगावकर ग्रामस्थ दसरा उत्सवाच्या लगबगीत गुंतले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
























