मोरगाव ग्रामपंचायत ने कर्मचाऱ्यांची दिवाळी केली गोड.
मिठाई, फराळ, गणवेशासह केले बोनसचे वाटप.
…………………..
स्टारयुग लाईव्ह : मोरगाव
बारामती तालुक्यातील मोरगाव ग्रामपंचायतीने यावर्षी दिवाळी सणानिमित्त कार्यरत कर्मचाऱ्यांना फराळ गणवेशासह बोनसचे वाटप केले. ग्रामपंचायतच्या या निर्णयाने कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड साजरी झाली असून, ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
तालुक्यातील राजकीय दृष्ट्या बहुचर्चित असलेल्या मोरगाव ता बारामती ग्रामपंचायतीने कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत कर्मचाऱ्यांचा दिवाळी सण आनंदमय व गोड केला आहे. गावच्या विद्यमान सरपंच अलकामाई तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपसरपंच केदार वाघ व माजी सरपंच निलेश केदारी यांच्या नियोजनात ग्रामपंचायत अधिकारी दीपक बोरावके एक महिन्याच्या पगारा इतका बोनस कर्मचाऱ्यांना वाटप केला. सदरची रक्कम दिवाळीपूर्वीच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.
या दिवाळी सणाला बोनस बरोबरच कर्मचाऱ्यांना फराळ मिठाईवाटप तसेच दोन जोडी गणवेश ही देण्यात आला आहे. मोरगाव ग्रामपंचायत ने हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी व त्यांच्या आर्थिक स्थितीला बळकटी देण्यासाठी घेतला असल्याचे ग्रामपंचायत अधिकारी दीपक बोरावके यांनी सांगितले. ग्रामपंचायतच्या या निर्णयामुळे कार्यरत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आनंद आणि समृद्धीला वाव मिळाला असून कर्मचाऱ्यांना यंदाची दिवाळी धुमधडाक्यात साजरी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ग्रामपंचायत कर्मचारी वर्षभर गावासाठी व ग्रामपंचायत साठी काम करत असतात. रात्री अपरात्री व अडचणीच्या काळातही ग्रामपंचायतला भक्कम साथ देत असल्याने या सर्व कामांची दखल घेऊन ग्रामपंचायत दिवाळी सणापूर्वीच कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व निर्णयाचे पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघ संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने ग्रामपंचायत विशेष स्वागत करून आभार मानले आहेत.
























