*सुप्याचा ऐतिहासिक भुईकोट किल्ला धन दांड्यांनी घातला घशात*.
…………………………..
*सुपे ग्रामस्थांनी केला कडकडीत गाव बंद करून निषेध*.
स्टारयुग लाईव्ह : मोरगाव
बारामती तालुक्यात छत्रपती शहाजी राजांच्या इतिहासाची साक्ष व ओळख असलेल्या सुपे परगण्याच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक असलेला भुईकोट किल्ला काही व्यक्तींनी बनावट व चुकीचे दस्तऐवज तयार करून बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतल्याची गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे येथील भुईकोट किल्ला नामशेष झाला असून सुपे परगण्यात संतापाची तीव्र लाट उसळली आहे.
या पवित्र, ऐतिहासिक आणि श्रद्धास्थान असलेल्या किल्ल्यावर नांगर फिरवून केलेल्या कृत्याने ग्रामस्थ, इतिहासप्रेमी, सामाजिक संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. हा प्रकार “इतिहासाच्या जखमेवर मीठ चोळणारा गुन्हा” असल्याचे सर्वांनी एकमुखाने सांगितले आहे.
या निषेधाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण सुपे गाव आज कडकडीत बंद ठेवण्यात आले असून, व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी व नागरिक यांनी स्वयंस्फूर्तीने या बंदला पाठिंबा दर्शवला आहे.
ग्रामस्थ आणि सामाजिक संघटनांच्या वतीने खालील मागण्या करण्यात आल्या आहेत :
1️⃣ भुईकोट किल्ल्यावरील सर्व बेकायदेशीर ताबा तातडीने रद्द करण्यात यावा.
2️⃣ बनावट दस्तऐवज तयार करणाऱ्यांविरुद्ध कठोर गुन्हेगारी कारवाई करण्यात यावी.
3️⃣ किल्ल्याच्या संरक्षणासाठी शासकीय चौकशी समिती स्थापन करून मूळ मालकी व ऐतिहासिक नोंदी सार्वजनिक करण्यात याव्यात.
“हा निषेध आहे — आपल्या इतिहासाचा!
ही लढाई आहे — आपल्या ओळखीची आणि स्वाभिमानाची!”
सुपे परगण्यातील नागरिक, ग्रामस्थ व सामाजिक संघटना या लढ्यात एकत्रितपणे उभ्या राहिल्या आहेत.
या आंदोलनाला ‘सजीव संरक्षण आणि जागृती बहुउद्देशीय सामाजिक संस्था, सुपे’ यांचा सक्रिय पाठिंबा असून, संस्थेने किल्ल्याच्या संरक्षणासाठी प्रशासनाकडे तातडीने चौकशी आणि कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
📍 सुपे परगण्याचा इतिहास आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी सर्व स्तरांवर लढा दिला जाईल — असा निर्धार ग्रामस्थ आणि संस्थेने व्यक्त केला आहे.
























