स्टारयुग लाईव : मोरगाव
बारामती तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या मोरगाव येथील मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी सक्षम सचिन यादव याने राज्यस्तरीय 14 वर्षाखालील गटात रत्नागिरी येथे पार पडलेल्या गोळा फेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. या राज्यस्तरीय स्पर्धेतील यशामुळे त्याची राष्ट्रीय पातळीवर निवड करण्यात आली आहे. त्याच्या यशामुळे मोरगाव परिसरातील नागरिकांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मोरगाव ता बारामती येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या सक्षम सचिन यादव या विद्यार्थ्याने गोळा फेक स्पर्धेत यशाचा आलेख तेवत ठेवला आहे. यापूर्वी त्याने बारामती तालुक्यातील माळेगाव येथे झालेल्या तालुकास्तरीय गोळा फेक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यानंतर त्याची जिल्हा पातळीवर निवड करण्यात आली होती त्याही ठिकाणी सक्षम ने प्रथम क्रमांक पटकावला होता.
तालुका व जिल्हा पातळीवर चमकदार कामगिरी करून यश मिळवल्यानंतर सक्षम यादव याची विभागीय पातळीवर निवड झाली होती त्याही ठिकाणी त्याने यश मिळवत दुसरा क्रमांक मिळवला होता. त्यानंतर नुकतीच रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण या ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतही सक्षम ने जोरदार कामगिरी करत चार किलोचा गोळा 13.64 मीटर फेकत राज्य पातळीवर दुसरा क्रमांक पटकावून यशाचा आलेख कायम राखून ठेवला. सक्षम यादव च्या या उत्तुंग यशामुळे त्याची राष्ट्रीय स्तरावरील ( देश पातळीवर) निवड झाली आहे.
जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन आणि कुटुंबाची भक्कम साथ मिळाल्यानंतर यशाला हमखास गवसणी घालता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे सक्षम यादव ठरलेला आहे. सक्षम ला तालुका पातळी पासून ते जिल्हा पातळी, विभागीय पातळी, राज्य पातळी व राष्ट्रीय पातळीपर्यंत च्या खडतर प्रवासात मयुरेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक अर्जुन कोकरे, पर्यवेक्षिका नंदा नाझीरकर, क्रीडा शिक्षक रमेश शेवते, सहाय्यक शिक्षक अमित आव्हाळे, प्रसिद्धी विभाग प्रमुख सारिका तांबे यांच्यासह सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे.
























