सुट्टी निमित्त ‘मोरगाव’ येथे गर्दी
————–
गणेश भक्तांनी घेतले श्रींचे दर्शन
अष्टविनायक स्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या मोरगावच्या श्री मयुरेश्वर मंदिरात आज सुट्टी निमित्त दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी आहे. पहाटेपासूनच मंदिराच्या समोर दर्शनाची रांग लागल्याचे पाहायला मिळाले.
बारामती तालुक्यातील हे तीर्थस्थान जागृत दैवत म्हणून प्रसिद्ध आहे. दर महिन्याच्या सार्वजनिक सुट्टीच्या निमित्त श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक येथे येत असतात. यासाठी पहाटे पाच वाजेपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांची अखंड दर्शन रांग पाहायला मिळते. आज शनिवार / रविवार सुट्टीचा योग आल्याने नेहमीच्या तुलनेत गर्दीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.
मोरगाव ग्रामपंचायत चे सर्व वाहनतळ तसेच मुख्य रस्त्यांवर भाविकांनी आणलेल्या गाड्यांची गर्दी दिसत होती. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया असा जयघोष करीत गणेश भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले. चिंचवड देवस्थान ट्रस्ट यांच्यावतीने दर्शनाला येणाऱ्या भक्तांना सर्व सोयी सुविधा पुरवण्यात आल्या.
























