श्री मयुरेश्वराचा राजेशाही दसरा
———————–
तब्बल सोळा तास रंगला मिरवणूक
स्टारयुग लाईव्ह : मोरगाव ( मनोहर तावरे )
सनई चौघड्यांचे मंगलमयसूर शोभेच्या दारूची आतषबाजी आणि पाच मानाच्या तोफांची ठिक ठिकाणी सलामी हे मोरगावच्या ‘राजेशाही’ दसरा उत्सवाचे आकर्षण आहे. या निमित्ताने श्री मयुरेश्वर मंदिरातून रात्री निघालेला श्रींचा पालखी सोहळा आज तब्बल सोळा तासानंतर मंदिरात परतला. यावेळी मानाची आरती होऊन उत्सवाची सांगता झाली.
मोरगाव येथे गेली शेकडो वर्षाची या सणाला ऐतिहासिक परंपरा आहे. येथील दसरा उत्सव पाहण्यासाठी दोन दिवस लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होते. मोरया मोरया चा जयघोष करत मंदिरातून रात्री आठ वाजता श्रींची पालखी ग्रामदैवत भेटीसाठी मार्गस्थ झाली. यावेळी प्रथम ऐतिहासिक पाच मानाच्या तोफांची सलामी देण्यात आली.
श्रींची पालखी मिरवणूक मंदिरातून ग्रामप्रदक्षिणेला जात असताना सुरुवातीला प्रथम पाच मानाच्या तोफा बैल जोड्यांच्या साह्याने ओढून नेत असताना पाहायला मिळाल्या. यानंतर तट बांधलेल्या पाच बैलगाड्या यामध्ये सनई चौघडे नगारे असे मंगल वाद्य वाजत होती. नित्य प्रथे प्रमाणे रात्री आठ वाजता धुपारती सह मंदिरातून पालखी बाहेर काढण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात शोभेच्या दारूची आतषबाजी करण्यात आली.
मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून निघालेला हा संपूर्ण पालखी सोहळा प्रथम बाजारपेठेतून जैन मंदिर, मारुती मंदिर, चिंचेची बाग व पालखी विसावा स्थळावर विश्रांतीसाठी थांबला. येथे तयार करण्यात आलेल्या भव्य रावणाच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. श्रींच्या पालखीचा राजेशाही थाट दिसत होता. मिरवणुकीत छत्री, चवरी, अब्दागिरी रुमाल परशु घेतलेले सेवेकरी दिसत होते.
बाजार तळावर विसावा घेतल्यानंतर पुढे मोरया गोसावी यांचे जन्मस्थळ असलेल्या पवळी येथे पालखी पोहोचली. आंबील दोरीन उत्सव मूर्ती बांधल्यानंतर येथे हरमळीचा खेळ खेळण्यात आला. पुढे पंचलिंग मंदिरातील दर्शन घेऊन पालखी सोहळा बुद्धिमत्ता मंदिरातून फिरंगाई येथे विसावला. संपूर्ण गावाच्या वतीने येथे मानाचा गोंधळ घालण्याची ऐतिहासिक परंपरा आहे.
मोरगाव- सुपा रोडवर नदीच्या पुलावरून महादेव भैरवनाथ व महालक्ष्मी मंदिरांना भेटी देत मिरवणूक मुख्य चौकात आली. यावेळी बारामतीच्या दिशेला पांडुरंगाची आरती करण्यात आली. मुख्य चौकातून गावच्या मध्यवर्ती लिंबागणेश येथे आरती व पुढे सोनोबा मंदिरात वंशावळी वाचन करण्यात आले. येथे आपटा पूजन करून मानाचा अंगारा वाटप करण्यात आले.
संपूर्ण रात्रभर सुरू असलेल्या पालखीचे मिरवणुकीसमोर प्रत्येकाच्या घरोघरी तयार करण्यात आलेले भुईनळे फटाके व शोभेच्या दारूची आतषबाजी सुरू होती. मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या भक्तांना ग्रामस्थांच्या वतीने सर्व ठिकाणी मोफत चहा नाष्टा भोजन दूध खाण्यापिण्याची मुबलक व्यवस्था करण्यात आली. सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात शोभेच्या दारूची आतशिबाची करण्यात आली.
जय गणेश प्रतिष्ठान व श्री मोरया प्रतिष्ठानने या संपूर्ण उत्सवाच्या नियोजनाच्या निमित्ताने महत्त्वाची भूमिका पार पाडली. लाखोंच्या संख्येने गावात होणारी गर्दी तसेच संपूर्ण उत्सवाचे नियोजन करत असताना गावातील शेकडो तरुण कार्यकर्ते निस्वार्थीपणे या संपूर्ण प्रक्रियेत सहभाग घेत असतात. ‘दसरा’ संपूर्ण गावाचा जिव्हाळ्याचा उत्सव म्हणून मानला जातो.
सोनोबा मंदिरातील वंशावळी वाचन झाल्यानंतर संपूर्ण पालखी सोहळा बारामती – पुणे या प्रमुख मार्गावरून शासकीय विश्रामगृहाच्या जवळ विसावला. येथे खंडोबाचे आरती व तोफांची सलामी देण्यात आली. ग्रामपंचायत मार्गे परत पालखी सोहळा विसाव्याच्या ठिकाणी मार्गस्थ झाला. रात्री आठ वाजता मंदिरातून निघालेला हा सोहळा दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दुपारी बारा वाजता मंदिरात परतला. यावेळी पारंपरिक मानाची आरती झाली यानंतर उत्सवाची सांगता झाली.
























